One of the Famous Turned trees |
शाळेत जाताना उजवीकडे गढीआईच मंदिर....हे एक प्राचीन मंदिर आहे...सगळं बांधकाम दगडी..मूर्तीसुद्धा प्राचीन...पण त्याची किंमत न समजल्यामुळे उपेक्षित...या गावाची आख्यायिका आहे...सांगते...प्राचीन काळी इथे मांडव ऋषी राहायचे...त्यांनी इथे बराच काळ घालवला...जेव्हा ते इथून पुढच्या जागी जायला निघाले तेव्हा कसलातरी आवाज आला म्हणून त्यांनी मागे वळून पहिले तर आजूबाजूच्या झाडांनी देखील मागे वळून पहिले आणि त्यांचे बुंधे तसेच राहिले...हि झाडे सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ बघायला मिळतात...तर या मांडव ऋषीच्या निवासाने पवित्र झालेला भाग म्हणजे मांडवगण...
सिद्धेश्वर मंदिर....हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे...जुने बांधकाम....मंदिराचा परिसर प्रचंड मोठा आहे...एका मोठ्या कमानीपासून आत समोरच एका भल्यामोठ्या हनुमानाच्या मूर्तीचे मंदिर आहे...इथून खाली चालले कि एक पावसाळ्यात वाहणारी म्हणून नदी म्हणायचे असा ओढा आहे...तो ओलांडून पुढे गेले कि २-३ मिनिट चालल्यावर अगदी हत्ती जातील अशा प्रचंड मोठ्या आणि रुंद पायऱ्या आहेत...त्या चढून सिद्धेश्वरला जायचे....मधेच एका उजव्या बाजूला मोठ्या वडाखाली मुसलमानाचा दर्गा आहे...पुढे चालत राहायचे....दोन्ही बाजूला मोकळी जागा...भन्नाट वारा
साथीला...मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या थोडेसे आधी उजव्या बाजूला एका छोट्या टेकडावर गंगेचे असे समजले जाणारे स्थान आहे....एका छोट्या दगडी खोलीत पायऱ्या उतरून गेले कि काळोखात खाली थोडेसे पाणी असते...वटवाघळे इथेच बघायला मिळतात...मंदिरात शिरताना एका मारुतीचे छोटेसे मंदिर आहे ....मारुतीला वंदन करून आत गेले कि .मोठीच्या मोठी दीपमाळ आपले स्वागत करते...आत जाताना आपल्याला एक बुटका आडवा दगडी खांब ओलांडून म्हणजे त्याखालून वाकून जावे लागते...देवासमोर नतमस्तक व्हायचे याची जाणीव करण्यासाठी असेल...सगळ्या भिंतीला लागून मोठेच्या मोठे उघड्यावरचे चौथरे आहेत....दीपमाळेच्या डाव्या बाजूने पायऱ्या उतरल्या कि मंदिराच्या मागच्या बाजूला जाता येते... सगळे बांधकाम दगडी आहे...खुद्द पिंडसुद्धा प्राचीन आहे...दीपमाळ ओलांडून गेले कि मोठा दरवाजा लागतो...जुना दरवाजा...त्यावर चौकोन चौकोन कोरून त्यामध्ये मोठमोठ्या कड्या लावलेल्या आहेत...तो ओलांडला कि लगेचच वरती मोठी घंटा आणि डाव्या आणि उजव्या बाजूला साधारण पाच साडेपाच फुट उंचीचे दगडी कट्टे...त्यावर नगारा ठेवलेला असे...आता बहुतेक नाही...रोज सकाळी हा नगारा वाजविण्यात यायचा...तसेच एका बाजूला एक मोठी तोफ आहे...कारण माहिती नाही...दारापासून ३-४ फुटांवर कासव...मग लगेच समोर एक छोटी दीपमाळ...नवीन बांधलेली असावी....त्याच्या उजवीकडे एक मोठी पण जुनी दीपमाळ...त्याभोवती कट्टा....त्यासमोरून वेगवेगळ्या छोट्या मंदिरांना सुरुवात होते...इथेही सगळे बांधकाम आणि मुर्त्या प्राचीन आहेत...मुख्य मंदिराच्या भोवती ५-७ वेगवेगळ्या देवी आणि देवतांची छोटी मंदिर आहेत....या दीपमाळेच्या समोरच्या मंदिरामागे एक यज्ञकुंड आहे...तिथे बरेचसे यज्ञ होतात...त्यापुढे थोडेसे गेले कि मोठ्ठा पिंपळ आहे आणि त्याखाली एक लहानसा नाला असा बांधलेला आहे....सिद्धेश्वरला आंघोळ घातली कि ते तीर्थ म्हणून येथे येते...थेंबभर तोंडात घ्यायचे....यज्ञवेदीच्या समोर १२ एक फुटांवर एक छानसे पांढऱ्या सुवासिक नरसाळ्याच्या आकाराच्या फुलांचे झाड आहे...त्याच्या फांद्या खूपच नाजूक असतात...झाडच नाव विसरले...
तर मुख्य मंदिरात आल्यानंतर जी छोटी दीपमाळ आहे तिच्यापासून लगेचच आतमध्ये मोठा थोरला नंदी पिंडीचे रक्षण करत बसलेला आहे....पोरांनी त्यावर सारखे चढू नये म्हणून बहुतेक त्याभोवती सळ्यांचा चौकोनी पिंजरा बांधलेला आहे....अर्थातच नंदी ४ एक फुट उंच चौथऱ्यावर आहे...या चौथऱ्यावर लोकांना ऐसपैस बसता येईल अशी भरपूर जागा आहे....इथून आत दोन्ही बाजूना लगेचच खांबांची रांग सुरु होते आणि प्रत्येक खांबावर एक मोठा आरसा आहे आणि वेगवेगळ्या देवांचे मोठे फोटो आहेत...गाभार्यात प्रवेश करण्याआधी परत एक दार ओलांडावे लागते...त्याच्या उजव्या बाजूला भिंतीत कोरलेला असा मारुती हातावर द्रोणागिरी घेऊन उडत आहे...गाभाऱ्यात जातानाचे दार ओलांडले कि आत अंधार असून दोन एक ठिकाणी समया आपला उजेड देत असतात...मध्यभागी एक मोठे काळया कुळकुळीत पाषाणाचे कासव आहे...हे सुद्धा प्राचीन काम....त्याला हळद कुंकू वाहून ७-८ फुट पुढे गेले कि गाभारा....एखादा दिवा तेवत असतो...पूर्ण शांतता...थंडगार वातावरण...फक्त पिंड आणि आपण...मनाला एकप्रकारची शांतता मिळते...म्हणजे मलातरी मिळते....या ठिकाणी आलं कि फक्त आहे तो क्षण याची आणि पिंडीची जाणीव असते...
तसेच उलट्या पावलांनी मागे यायचे कासवापर्यंत....आणि मग गाभार्यातून बाहेर...मन प्रसन्न होऊन जाते...
नंदीच्या डाव्या बाजूला मोठा १०-१२ फुट चौथरा बांधलेला आहे...कशासाठी काही माहिती नाही...त्यावर जायचे तर शिडी लावूनच जावे लागते....तर या मंदिराच्या चहुबाजूला एकसंध असे ४-५ फुट उंचीचे चौथरे आहेत जिथे निमित्ताने गाव जेवणे वगैरे कार्यक्रम होत असतात...किंवा असत म्हणावे लागेल...आताची परिस्थिती माहित नाही...यातील एका चौथार्यालाच भिंत वगैरे बांधून गुरवाची त्याच्या कुटुंबासहित राहायची सोय केलेली आहे....या मोठ्या चौथर्यापासून जरा उजवीकडे वळून थोडे पुढे गेले कि एक मोठे दार येते...या बाजूने बऱ्याच पायऱ्या खाली उतरल्यावर एक भले मोठे पाण्याचे कुंड लागते...ते बरेच खोल आहे आणि त्यातले पाणी कायम हिरवट असते...शेवाळ साचून साचून....याप्रकारच्या कुंडाला काहीतरी नाव आहे ते मी विसरले...बहुतेक बारव म्हणत असावेत...या कुणाच्या अलीकडेच एक गंगेची छोटी जागा आहे....असे म्हणतात कि तिथे गंगा येते...इथे जायला चिंचोळ्या पायऱ्या उतरून खाली जावे लागते...खाली एक छोटी खोली सारखे आहे तिथे कायम पाणी असते...पावसाळ्यात पाणी थोडे वर चढून पायरीपर्यंत येते....मला इथे जायला कायम भीती वाटते...तर या मागील भागात भरपूर चिंचेची झाडे आहेत...नेहमी इथे सावली असते...या मागच्या बाजूकडून गावाचा एक भाग ज्याला पेठ म्हणतात तिकडे जायचा रस्ता आहे....आजूबाजूला सगळे जंगल...वरती सांगितलेली मागे वळून पाहणारी झाडे देखील याच भागात आहेत....त्या झाडांजवळ अजून काही छोटी छोटी मंदिरे आहेत...इथेच हिंदू स्मशानभूमी आहे...कदाचित म्हणूनच अजून एक छोटेसे शिवाचे मंदिर आहे...
सिद्धेश्वर आणि हि झाडे आणि मंदिरे यामध्ये एक छोटी नदी वाहते...म्हणजे पावसाळ्यात तिथून पाणी वाहत असते...बाकी एरवी खडखडाट....गावच्या बायका इथे भांडी घासायला आणि धुणी धुवायला येतात.
तर असे हे माझे प्राचीन स्थळे मिरवणारे गाव....मांडवगण...दुर्लक्ष आणि प्राचीन वस्तू आणि ठिकाणाबद्दलच्या अनास्थेमुळे कोणालाही दखल न घ्यावेसे वाटलेले गाव...पण आता असे ऐकून आहे कि एका मोठ्या बिल्डरने इथे बांधकाम सुरु केले आहे...कदाचित जग जवळ आल्यामुळे प्राचीन मंदिरे जतन करण्याची आणि त्यापेक्षाही कॅश करण्याची जागरूकता आली असेल....मध्ये ४-५ वर्षापूर्वी गावाच्या नव्या नेतृत्वाने म्हणे गाभार्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतून मंदिर विरूप केले....गावातील प्रतिष्ठित मंडळीनी आक्षेप घेऊन ते थांबविले....तर तुम्हाला जमेल तेव्हा इथे भेट जरूर द्या....खात्रीने सांगते कि तुम्हाला पश्चाताप होणार नाही...अहमदनगरपासून साधारण ४५मि. ते एक तासाच्या अंतरावर हे गाव आहे....नगरलाच रहा...इथे गैरसोय होईल.
backyard of the Siddheshwar |
dipmal |
side wall of the Gabhara entrance |
one of the small mandir in Siddheshwar |