Wednesday, February 9, 2011

बोबडी

सगळे तिला बोबडीच म्हणायचे....अर्थात तिच्या समोर नाही...
मी तिला पहिल्यांदा कधी पहिले ते आठवत नाही... मी साधारण ४-६ वर्षाची असताना आज्जी मला मुंबईला घेऊन जायची, तेव्हा असेल कदाचित...ती आजीची मैत्रीणच होती म्हणा ना!! आईच्या म्हणण्यानुसार ती माझ्या पणजीला कुठे पीठ आणून दे, कुठे किराणा आणून दे वगैरे फुटकळ कामे करी...
साधारण आजीच्याच वयाची असेल...नेहमी घरी यायची...घर म्हणजे तरी काय...फक्त एक छोटी खोली...तीच बेडरूम, लिविंग रूम, किचन...चाळीतल्या खोल्या अजून कशा असायच्यात!! 

गिरगावात राहायचो आम्ही त्यावेळेस...नेमकी चहाची वेळ साधून बोबडी नेहमी घरी यायची......त्यावेळेस आमचीच पंचाईत असायची...मग तिला चहाचा एक कप दिला जायचा...कदाचित तेव्हढ्यासाठी ती "ती " वेळ साधून येत असावी...मग आम्ही हळूच बिस्कीट कपात टाकायचो...तिला दिसू नये म्हणून...मग तसाच चहा प्यायचा....

एकदा काही कारणाने मी तिच्या घरी गेले...घरी एक जाऊ होती जी ऑर्डरनुसार चकल्या, लाडू वगैरे वगैरे बनवायची....हाताला खूप चव होती तिच्या...बर्यापाकी ऑर्डरी मिळायच्या...घर चालवायची....त्या उलट बोबडी...उपजीविकेची साधन म्हणजे नवरा...तो काय करायचा काय माहित....तिचे घरसुद्धा आमच्यासारखेच....अजून कसे असायचेय!!! तिच्या घरी अर्थातच तिच्या मताला काही किंमत नाही...मला फार वाईट वाटायचे...पण काय करणार? जगाचा नियम...

मी गावातून मुंबईत आले तेव्हा माझ्यासाठी शाळा शोधणे चालू होते....आमच्या घरमालकांनी आम्ही अगदीच दरिद्री आहोत असे वाटून मुन्सिपाल्तीची शाळा सुचवली, पण बोबडीने डी.जी.टी. शाळेबद्दल सांगितले आणि मी बर्यापिकी शाळेत गेले...मध्यमवर्गीयांची शाळा...चांगली होती..अजूनही आहे, पण कशी ते माहिती नाही..

काही काळाने आम्ही ते घर सोडून उपनगरात आलो...बोबडीचा विसर पडला...अशातच ती एकदा आली...दार उघडल्याबरोबर माझ्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली...लगेच संशय आला कि काहीतरी ठीक नाही...आणि तिने सांगितलेच...वाईट वाटले...आता जावेच्याच जीवेवर जगणे आले..ती काही खूप वाईट होती अश्यातला भाग नाही, पण तरीही...

कसे असते ना आयुष्य? आता कदाचित नसेलही ती...सॉरी..त्या आजी...