Sunday, July 18, 2010

माझे पोहणे

आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...

मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.

लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,

तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...

मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर  प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....

माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...

सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का?  थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...

आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.

Thursday, July 15, 2010

माझा एक थरारक अनुभव

मुंबईत असतानाकामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...

त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि
मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत
चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या
पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...

असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...
हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच  एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....

एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..

तर असा हा माझा एक अनुभव.

Recovery