Thursday, June 3, 2010

...आणि म्हातारीच्या अंगावर सायकल गेली (चुकून )

मला लहानपणापासूनच सायकलची भारी हौस..चालण्याऐवजी सायकल आवडायची...लहानपण गावातच गेलं त्यामुळे स्पेशल लहान मुलांची सायकल वगैरे काही फालतू लाड नसायचे...जी मिळेल ती घ्यायची...मोठी सायकल त्याच्या दांड्याच्या मधून पाय टाकून एक चालवायला लागायची...जड बुदुक सायकल खुपदा पेलायची नाही आणि मी खाली आणि सायकल वर असा प्रकार व्हायचा...पण हौस काही फिटली नाही...अजूनही...

गावाला सायकल चालवताना फार्फार गोष्टींचे भान ठेवायला लागायचे...तुम्हाला वाटेल गावात काय खूप रहदारी नसते त्यामुळे किती सोपंय सायकल चालवणं...पण ते काही खरं नाही..धुळीचा रस्ता आणि त्याभोवती बऱ्याचदा येड्या बाभळीचे काटे (खरं तर हे काटे मेले सगळीचकडे असायचे) , गाय, बैल, म्हशी आणि देवाला सोडलेला वळू ( याला काहीतरी नाव आहे ते विसरले) ...भटके कुत्रे बोनुस...याशिवाय अधेमध्ये रस्ता सोडून पळणारे पोरं आणि चालणारे  बाया...जरा धक्का लागली कि निघालीच तुमची आय-माय....

अशातच एकदा मी ६-८ वर्षाची असताना सायकल खेळत होते आणि जवळच्या घराच्या पारावर असलेल्या येड्या बाभळीच्या सरपणावर पडले...माझी लहान बहिण आणि तिच्याच वयाची मामाची मुलगी या दोघी जवळच खेळत होत्या...मी पडले हे पाहून या भवान्या जवळ आल्या आणि त्यांना "मला काट्यातून बाहेर यायला मदत कर...हे काटे बाजूला घे" सांगितले ....मदत दूरच पण या दोघी फिदीफिदी हसायला लागल्या...मला इतका राग आला...मग मी कशीतरी त्या काट्यातून बाहेर आले आणि या दोघींना फटकावले...लागल्या लगेच जोरजोरात भोकाड पसरायला...ते ऐकून माझी आई बाहेर आली आणि मी काट्यात पडले, मला लागलं हे काही न बघता मला धपाटा घातला...आणि मी काट्यात पडल्याचे सांगितले तर ती पण हसायला लागली...दुष्ट आहेत सगळे...

हां...तर काय सांगत होते मी ? म्हातारीच्या अंगावर सायकल कशी गेली...तर आम्ही पुण्याला मामाकडे गेलो होतो एका सुट्टीत...त्यावेळी मी काहीतरी १० एक वर्षाची असेन...तिथेही सायकल खेळायचे चालू होते...मामा ज्या ठिकाणी राहत होता त्या गल्लीचा रस्ता सरळसोट नव्हता तर मध्येमध्ये मोठे दगड, उंचवटे इ. सायकल चालावण्यासाठीच्या दृष्टीने लहान मुलांसाठी एक साहसी रस्ता होता...ते च्यालेंज घेऊन मी दिवसभर भिरीभिरी सायकल खेळायचे...एकदोनदा म्हशींच्या गोठयातच घुसणार होते...असो..

तर इतरही अशा सायकल खेळणाऱ्या पोरी होत्या त्यांच्याबरोबर मैत्री झाली... एका सकाळी छान उन पडले होते आणि आवरून मी सायकल खेळायला बाहेर पडले...म्हशींच्या गोठ्यापासून थोडे पुढे गेल्यावर एका मैत्रिणीची हाक ऐकू आली...ती मला तिच्याकडचे एक पुस्तक वाचायला देणार होती...मी आपली वर बघून तिच्याशी बोलत सायकल चालवत होते...तिच्या घराच्या समोर एक स्कूटर उभी होती....पाय ठेवतो त्या जागी एक आजीबाई बसल्या होत्या...बऱ्याच म्हाताऱ्या होत्या...मामीने नंतर सांगितले कि त्यांचे वय ९० वर्षे आहे....तर वर बघून सायकल चालवताना समोर लक्ष राहत नाही हे त्या दिवशी कळले...आणि त्याचबरोबर आपल्याला अजून सायकल नीट चालवता येत नाही हाही साक्षात्कार झाला...तोल गेला आणि मी स्कूटरवर आपटले...त्याबरोबर आजीबाई पडल्या....मग एकाच गोंधळ....त्यांच्या घरातला एक माणूस आला आणि मला बोलायला लागला...माझी सायकल अडवून धरली ....मी १० एक वर्षाचीच होते त्यामुळे अक्कल नव्हती...मी चुकले मला कळले पण त्या माणसाचा राग आला होता....आणि माफी मागण्या ऐवजी मी वाद घालायला लागले...मग आमच्या घरापर्यंत बातमी गेली आणि मामी आणि आई आली आणि लोकांची समजूत घातली....आजींची चौकशी केली...फार काही झाले नव्हते पण त्यांचे वय बघता काळजी घेणे जरुरी होते...

मग मी त्या आजींना sorry म्हणून आले आणि सायकल घेऊन घरी आलो.........मग पुन्हा काही सायकलला हात लावू दिला नाही...नंतर पुन्हा कधी मामाकडे गेलो कि त्या घटनेची आठवण यायची...

3 comments:

  1. Frankly, I read only this article of ur blog & I must say, you have very good writting skills.. btw, saw ur profile as well.. mandavgan to california.. nice journey.. keep good going..

    ReplyDelete
  2. तुमच्या नगरकडे माहित नाही, पण जालना जिल्ह्यात माझे बालपण गेले. तिथे आम्ही वळूस ' कठान्या /कठाल्या' असे म्हणत असू. बाकी लेख आवडला.

    ReplyDelete